---Advertisement---
राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या जीआरमधील काही अटींमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेले होते. या अन्नत्याग आंदोलनाला गिरीश महाजन यांनी भेट देऊन चर्चा केली. आणि हि सकारात्मक झाल्याने अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
पंढरपूर येथील आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असल्याचा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तसेच आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले.
चर्चेदरम्यान मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. त्यानंतर सरकारकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करत रोहित पवार यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, २२ जूनपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ३० जूनपासून कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याने त्याआधीच संबंधित जीआरमधील त्रुटी आणि शेतकऱ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या अटींमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच कर्जमाफीसंदर्भातील चर्चेत विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि प्रमुख शेतकरी नेत्यांना सहभागी करून घेण्याचा प्रस्तावही रोहित पवार यांनी मांडला. या बैठकीत शेतकरी नेते राजू शेट्टी, अजित नवले, रविकांत तुपकर, महादेव जानकर, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सहभागी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रोहित पवार यांनी सरकारला स्पष्ट इशारा देत सांगितले की, कर्जमाफीतील दोन महत्त्वाच्या अटींबाबत समाधानकारक निर्णय झाला नाही, तर ४ जुलैपासून मराठवाड्यात पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल. मात्र, सध्या चर्चेला आणि तोडग्याच्या प्रक्रियेला संधी देण्यासाठी आंदोलन मागे घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









