उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची दखल; नशिराबादच्या वाकी नदी स्वच्छता मोहिमेला वेग….!

---Advertisement---

 

नशिराबाद शहरातून वाहणारी वाकी नदी गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषण, साचलेला कचरा आणि नदीपात्रातील गाळामुळे गंभीर अवस्थेत पोहोचली होती. पावसाळ्यात नदीचा प्रवाह अडथळित होऊन पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रोहित बाळू चौधरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विविध निवेदने देत त्यांनी नदी स्वच्छतेची मागणी लावून धरली होती. अखेर १९ जून रोजी सकाळी १० वाजेपासून नगर परिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेत वाकी नदी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.

नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील (पिंटू शेठ) व नगरपरिषद यांच्या पुढाकाराने आणि नगर परिषदेच्या माध्यमातून नदीपात्रातील कचरा हटविणे, गाळ काढणे, अडथळे दूर करणे तसेच पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा यासाठी यंत्रसामग्रीच्या साहाय्याने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कामाचा नगराध्यक्ष स्वतः वेळोवेळी आढावा घेत असून कामाची गुणवत्ता आणि गती यावर विशेष भर देत आहेत.

या मोहिमेमुळे नदी परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे स्वागत केले आहे. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

वाकी नदीची स्वच्छता आणि संवर्धन ही केवळ प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही सामाजिक कर्तव्य आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून वाकी नदी पुन्हा स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि प्रवाही करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत असून या मोहिमेला नशिराबादकरांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---