---Advertisement---
ग्रामीण महाराष्ट्रातील अठरापगड जातींच्या परंपरेत सुतार समाजाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गावाच्या अर्थकारणापासून ते शेतीच्या प्रत्येक कामापर्यंत सुताराची भूमिका अविभाज्य होती. मात्र बदलत्या काळासोबत शेतीचे यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि जीवनशैलीतील बदल यामुळे शतकानुशतके चालत आलेला हा पारंपरिक व्यवसाय आज अस्तित्व टिकवण्यासाठी झुंज देताना दिसत आहे.
एकेकाळी गावातील प्रत्येक शेतकऱ्याचा सुताराशी थेट संबंध असायचा. बैलगाडी, नांगर, वखर, कुळव, जू, तिफण, पाभर, दांडे, खांब आणि शेतीसाठी लागणारी असंख्य लाकडी अवजारे तयार करण्यासाठी सुतारांवरच अवलंबून राहावे लागायचे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनात सुतार हा आवश्यक घटक होता. मात्र आज ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि अत्याधुनिक कृषी यंत्रसामग्रीच्या वापरामुळे या पारंपरिक अवजारांची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
बैलजोडी संस्कृती लोप पावताच व्यवसायाला उतरती कळा
पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगणात बैलजोडी असायची. त्या बैलांसाठी लागणारे जू, गाडीची चाके, नांगर, दांडे आणि इतर साहित्य तयार करण्यासाठी सुतारांना वर्षभर काम मिळायचे. गावातील सुताराच्या घरासमोर लाकडाचा ढीग आणि कामाची लगबग कायम दिसत असे. मात्र ट्रॅक्टरच्या आगमनानंतर बैलजोडींची संख्या झपाट्याने कमी झाली. परिणामी या साहित्याची मागणी जवळपास संपुष्टात आली आणि सुतार व्यवसायाच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला.
‘खाऊटी’ पद्धत झाली इतिहासजमा
ग्रामीण अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा आधार असलेली ‘खाऊटी’ पद्धतही आता इतिहासजमा झाली आहे. पूर्वी सुतार वर्षभर शेतकऱ्यांची कामे करत असत आणि त्याबदल्यात त्यांना धान्य, कडधान्य किंवा शेतीमालाच्या स्वरूपात मोबदला मिळत असे. त्यामुळे वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालायचा. मात्र रोख व्यवहार वाढले, शेतीतील गरजा बदलल्या आणि कामांची संख्या कमी झाली. त्यामुळे खाऊटीची परंपरा आज फक्त ज्येष्ठांच्या आठवणीत उरली आहे.
रेडीमेड फर्निचरमुळे स्थानिक कारागिरांवर संकट
बदलत्या बाजारपेठेत रेडीमेड फर्निचरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरांमधून तयार फर्निचर सहज उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील पारंपरिक सुतारांना स्पर्धा करणे कठीण झाले आहे. अनेक कारागिरांकडे आधुनिक मशीनरी किंवा मॉड्युलर फर्निचर तयार करण्याचे प्रशिक्षण नसल्यामुळे त्यांना केवळ प्लायवूडचे दरवाजे, खिडक्या आणि किरकोळ कामांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
युवकांची पारंपरिक व्यवसायाकडे पाठ
सुतार समाजासमोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे नव्या पिढीचा या व्यवसायाकडे कमी होत चाललेला कल. कमी उत्पन्न, अनिश्चित रोजगार आणि वाढत्या स्पर्धेमुळे युवक शिक्षण घेऊन शहरांकडे नोकरी किंवा इतर व्यवसायांच्या शोधात वळत आहेत. परिणामी पिढ्यान्पिढ्या चालत आलेले कौशल्य पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत नाही. त्यामुळे काही वर्षांनंतर हा व्यवसाय इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वेल्डिंग व्यवसायाकडे वाढता कल
आधुनिक बांधकाम क्षेत्रात लोखंडी साहित्याची मागणी वाढल्याने अनेक सुतारांनी आपला मोर्चा वेल्डिंग व्यवसायाकडे वळवला आहे. खिडक्या, दरवाजे, जिने, पत्र्याचे शेड तसेच शेतीसाठी लागणारी लोखंडी अवजारे तयार करण्याचे काम अनेकांनी सुरू केले आहे. त्यामुळे लाकडी काम करणाऱ्या पारंपरिक कारागिरांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. जे काही मोजके कारागीर अजूनही लाकडी अवजारे तयार करतात, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे दिसून येते.
विश्वकर्मा योजनेचा लाभ अद्याप दूरच
पारंपरिक कारागिरांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली असली तरी ग्रामीण भागातील अनेक सुतार कारागिरांना या योजनेचा अपेक्षित लाभ मिळालेला नाही. अनेकांनी अर्ज करूनही कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधनसामग्री किंवा आर्थिक सहाय्य मिळाले नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे या योजनेबाबत सुतार समाजामध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.
हरवत चाललेली एक ओळख
गावात सुताराचे घर ओळखायचे ते घरासमोरील जमिनीत गाडलेल्या लाकडी ओंडक्यावरून. ग्रामीण भागात त्याला ‘नेट’ म्हणून ओळखले जायचे. याच नेटवर बसून लाकूड घडवले जायचे, शेतीची अवजारे तयार व्हायची आणि अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालायचा. मात्र बदलत्या काळात हे नेटही आता सुतारांच्या दारासमोरून गायब होत आहे. त्यासोबतच ग्रामीण संस्कृतीचा एक महत्त्वाचा वारसा देखील हळूहळू लुप्त होताना दिसत आहे.
सुतार व्यवसाय हा केवळ रोजगाराचे साधन नसून ग्रामीण जीवनपद्धतीचा आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. हा वारसा टिकवण्यासाठी शासन, समाज आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा आधुनिकतेच्या वेगवान प्रवाहात अठरापगड जातींच्या या पारंपरिक व्यवसायाचे अस्तित्व भविष्यात केवळ इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.









