---Advertisement---
जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पहिल्याच फेरीत आवश्यक मतांचा टप्पा पार करत त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय संपादन केला.
या निवडणुकीची प्रक्रिया सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली होती. महायुतीमध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार की शिवसेनेला, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. मात्र पक्षाने रावेर लोकसभा क्षेत्राचे प्रमुख नंदकिशोर महाजन यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली.
दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात अपक्ष उमेदवार अनिल चौधरी तसेच शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांनीही अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चौरंगी लढत निर्माण झाली. महाविकास आघाडीने शरद तायडे यांना उमेदवारी दिली होती.
अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत चारही उमेदवार मैदानात असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली होती. मात्र नंतर रेश्मा कुंदन काळे आणि अनिल चौधरी यांनी माघार घेतल्याने अखेर नंदकिशोर महाजन आणि शरद तायडे यांच्यात थेट सामना झाला.
१८ जून रोजी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी सुमारे ९७ टक्के इतकी राहिली. त्यानंतर २२ जून रोजी सकाळी अल्पबचत भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक बॅलेट पेपरद्वारे झाल्यामुळे मतपत्रिकांची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच नंदकिशोर महाजन यांनी आघाडी कायम ठेवली. पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक मतसंख्या त्यांनी गाठल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्याची गरज भासली नाही. महाजन यांना तब्बल ५७७ मते मिळाली. त्यामुळे त्यांनी एकतर्फी विजय मिळवत महायुतीची ही जागा कायम राखली.
महाजन यांच्या विजयाची बातमी समोर येताच महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनी जल्लोष साजरा केला. अधिकृत निकालाची घोषणा होणे बाकी असले तरी महाजन यांचा विजय निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.









