---Advertisement---
अंबाजोगाई शहरात जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राला मारहाण होत असताना वर्षभरापूर्वी मध्यस्थी करून भांडण सोडवणाऱ्या तरुणावरच आरोपींनी सूड उगवत तलवार आणि बॅटने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात शशीकांत माने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना अंबाजोगाई परिसरातील सितारा टॉकीजजवळ घडली. जखमी शशीकांत माने हे कुंबेफळ येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
माहितीनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी कल्याण दंडवते या तरुणाला काही जणांनी मारहाण केली होती. त्यानंतर आणखी एका घटनेत त्याच्यावर पुन्हा हल्ला होत असताना शशीकांत माने यांनी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी मध्यस्थी करून मित्राला वाचवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
मात्र ही बाब काही आरोपींच्या मनात कायम राहिली. त्यातूनच जुन्या रागातून शशीकांत माने यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे. गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास जयप्रभा शाळेजवळ आरोपींनी त्यांना अडवून हल्ला केला. बॅटने मारहाण केल्यानंतर तलवारीनेही वार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात शशीकांत माने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात अशोक मुकुंद मोरे, सैपान उर्फ सोपियान शेख, किशोर उर्फ कृष्णा मुंडे आणि रितेश चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जुन्या वैमनस्यातून झालेल्या या हल्ल्याची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.









