भीषण अपघात; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, महिलेला चिरडून मृत्यू…!

---Advertisement---

 

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडशी परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हातखंबा-रत्नागिरी मार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेनंतर दुचाकीवरील महिला रस्त्यावर फेकली गेली आणि डंपरखाली दबून तिचा जागीच मृत्यू झाला.

जाकादेवी येथील पांचाळ कुटुंब दुचाकीवरून प्रवास करत होते. त्यावेळी खेडशी परिसरात पाठीमागून वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला खाली पडली. त्यानंतर नियंत्रण सुटलेला डंपर रस्त्याच्या कडेला जाऊन महामार्गावरून खाली कोसळला. या दुर्घटनेत महिला डंपरखाली दबली गेल्याने तिचा मृत्यू झाला.

या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि प्रशासनालाही माहिती देण्यात आली.

विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच परिसरात काही वेळापूर्वी एका रिक्षाचाही अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच दिवशी एकाच ठिकाणी दोन अपघात घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

अपघातानंतर हातखंबा-रत्नागिरी मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे जाकादेवी आणि खेडशी परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत महिलेच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---