नशिराबाद हादरले! कौटुंबिक वादाचे भीषण रूप; पत्नीची कोयत्याने निर्घृण हत्या, आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात…!

---Advertisement---

 

नशिराबाद येथील खंडेराव मंदिर परिसरात कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेची तिच्याच पतीने कोयत्याने निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंदाबाई जाधव (वय 28) यांच्यावर त्यांचे पती विकास जाधव (वय 32) यांनी दारूच्या नशेत असताना कौटुंबिक वादाच्या कारणावरून कोयत्याने मानेवर आणि शरीरावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचे दृश्य पाहून परिसरातील नागरिक हादरून गेले.

घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू केली. खून करून आरोपी विकास जाधव घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि शिताफीने शोधमोहीम राबवत त्याचा माग काढला. अखेर जवळील शेत परिसरातून त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.

मृत मंदाबाई या नशिराबाद येथील रहिवासी असून त्या रामा सोमा बागले यांची कन्या आहेत. त्यांचा विवाह रायपूर येथे झाला होता. काही दिवसांपासून पती-पत्नी नशिराबाद येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक वाद हे हत्येमागील कारण असल्याचे समोर येत असले तरी नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे नशिराबाद परिसरात शोककळा पसरली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नशिराबाद पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---