मोठी घडामोड; ठाकरेंचे आमदारही फुटण्याच्या तयारीत? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला तीन आमदार गैरहजर; राजकीय चर्चांना उधाण….!

---Advertisement---

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सहा खासदारांच्या बंडानंतर आणखी एक धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली असताना तीन आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदार शिंदे गटात दाखल होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची भूमिका घेतल्यानंतर ते शिंदे गटात सामील होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या घडामोडींमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली. मात्र या बैठकीला आमदार संजय पोतनीस, संजय दरेकर आणि राहुल पाटील अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खासदारांनंतर आमदारांमध्येही नाराजी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुसरीकडे, शिंदे गटात जाण्याची तयारी करणारे बंडखोर खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या खासदारांशी शिंदे यांची बैठक सुरू असून पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे.

या घडामोडींनंतर ठाकरे गटाकडूनही संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यातील विविध मतदारसंघांचा दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील शिवसेनेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होताना दिसत असून, पुढील काही दिवसांत या घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---