---Advertisement---
नाशिकमधील बहूचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात झाली आहे. चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झालेल्या पहिल्या लूकने सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे.
‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ या चित्रपटात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या लूकची पहिली झलक समोर आली असून त्या एका चर्चित महिला नेत्या साकारत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या भूमिकेची आणि व्यक्तिरेखेची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
चित्रपटातील सर्वाधिक उत्सुकता अशोक खरात यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याबाबत आहे. निर्मात्यांनी अद्याप या कलाकाराचे नाव जाहीर केलेले नाही. समोर आलेल्या फोटोत संबंधित अभिनेता पाठमोरा दिसत असल्याने त्याची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या भूमिकेत नेमका कोणता अभिनेता झळकणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
अशोक खरात प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. या प्रकरणामुळे सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर या घटनांवर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो चर्चेत असून आता प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू झाल्याने प्रेक्षकांचे लक्ष या प्रकल्पाकडे लागले आहे.
चित्रपटातील कलाकार, कथानक आणि इतर तपशीलांविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पहिल्या लूकनंतर ‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’बाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.









