---Advertisement---
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि देशातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या रोहित शर्माला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात रोहितने हा प्रतिष्ठेचा सन्मान स्वीकारला. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर रोहितने सोशल मीडियावर केलेली भावूक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
भारतीय क्रिकेटमधील गेल्या दोन दशकांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने रोहित शर्माची पद्मश्री पुरस्कारासाठी निवड केली होती. टी-20 विश्वचषक 2024 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने बजावलेल्या नेतृत्वाचीही या सन्मानामागे मोठी भूमिका मानली जात आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोहितने सोशल मीडियावर भावना व्यक्त करत लिहिले, “23 जून हा दिवस माझ्या आयुष्यात नेहमीच विशेष राहिला आहे. 19 वर्षांपूर्वी याच दिवशी भारताची कॅप मिळाली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास सुरू झाला. आज त्याच दिवशी आयुष्यात आणखी एका अभिमानास्पद पर्वाची भर पडली आहे.”
रोहित शर्माने 23 जून 2007 रोजी आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक विक्रमांची नोंद केली. सुरुवातीला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळणाऱ्या रोहितने 2013 पासून सलामीवीर म्हणून नवी ओळख निर्माण केली आणि जागतिक क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर अनेक विक्रम आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन द्विशतके झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. तसेच 264 धावांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 653 षटकारांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.
रोहितने आपल्या कारकिर्दीत 67 कसोटी, 285 एकदिवसीय आणि 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत 12 शतकांसह 4,301 धावा, एकदिवसीय सामन्यांत 33 शतके आणि 62 अर्धशतकांसह 11,720 धावा, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतके आणि 32 अर्धशतकांसह 4,231 धावा त्याने केल्या आहेत.









