---Advertisement---
यावल पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरातून पळून गेलेली अल्पवयीन मुलगी आणि मुलगा यांचा शोध लागला आहे. मंगळवारी मध्यरात्री नाकाबंदी दरम्यान चोपड्याकडून यावलकडे येणाऱ्या एका ट्रकमध्ये हे दोघे आढळून आले. यावेळी ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस हवालदार एजाज सलीम गवळी, अर्षद कासम गवळी, वरिष्ठ फलटण नायक पंकज फिरके आणि वाहन चालक ज्ञानेश्वर सपकाळे हे चोपडा-यावल मार्गावर नाकाबंदी करत होते.
दरम्यान, मध्यरात्रीनंतर गुजरात नोंदणी क्रमांकाचा एक ट्रक भरधाव वेगाने यावलच्या दिशेने येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबवून चालकाची चौकशी केली असता चालक अमोल शंकर जयप्रकाश पांडे (रा. भगवानपूर, बिहार) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. तसेच तो संशयास्पद उत्तरे देत वाहनात कोणी नसल्याचे सांगत होता.
चालकाच्या वागणुकीमुळे संशय बळावल्याने पोलिसांनी ट्रकची सखोल तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये १७ वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आढळून आली. चौकशीदरम्यान दोघांनी आपण एकमेकांना ओळखत असल्याचे सांगितले. पुढील तपासात दोघेही घरातून निघून आल्याचे समोर आले.
हे दोघे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील उपरखेड परिसरातील असून ते आपल्या कुटुंबासोबत चाळीसगाव तालुक्यात ऊसतोडीसाठी आले होते. तेथून ते निघून गेल्याची माहिती तपासात समोर आली.
पोलिसांनी तत्काळ दोन्ही अल्पवयीन मुलांना सुरक्षित ताब्यात घेत त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. संबंधित पालकांना याबाबत माहिती देण्यात आली असून ते मुलांना घेण्यासाठी यावलकडे रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ट्रकचालकाविरुद्ध मद्यप्राशन करून वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगा आणि मुलगी मद्यधुंद चालकासोबत प्रवास करत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.









