मोटार काढताना ५० फूट खोल विहिरीत ३ जण कोसळले; आजोबा-नातू गंभीर जखमी, अग्निशमन दलाचे थरारक रेस्क्यू

---Advertisement---

 

जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात घरगुती विहिरीतील इलेक्ट्रिक मोटार काढण्याचे काम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली. सिमेंटचा धापा अचानक तुटल्याने तिघेजण सुमारे ५० फूट खोल जुन्या विहिरीत कोसळले. या अपघातात आजोबा आणि नातू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरातील एका घरगुती विहिरीतून इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू होते. यावेळी विहिरीवर उभे असलेल्या तिघांचा तोल सिमेंटचा धापा तुटल्याने गेला आणि ते थेट विहिरीत पडले. या दुर्घटनेत रामलाल हिरामण भावसार आणि त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार हे गंभीर जखमी झाले. तर शेजारील देवेंद्र राजेंद्र खाचणे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विहीर सुमारे ५० फूट खोल असल्याने बचावकार्य आव्हानात्मक होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरखंड आणि विशेष साहित्याच्या मदतीने थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवत तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. जखमींना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून आजोबा आणि नातू यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिसरातील जुन्या आणि बंदिस्त विहिरींची माहिती घेऊन आवश्यक तपासणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींच्या मालकांना नोटिसा बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---