पारोळ्यात पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर साचले पाण्याचे तळे; नागरिकांना चिखल, पाण्यातून काढावी लागतेय वाट…!

---Advertisement---

 

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने शहरातील अत्यंत गजबजलेला आणि महत्त्वाचा मानला जाणारा पीर दरवाजा ते मडक्या मारोती चौक हा मुख्य रस्ता पहिल्याच पावसात थेट पाण्याच्या तलावात रूपांतरित झाला आहे.  या रस्त्यावरून चालणे म्हणजे नागरिकांसाठी जीवघेणी सर्कस ठरत आहे.

हा रस्ता शहराच्या अनेक प्रमुख भागांना जोडणारा मुख्य दुवा आहे. पाण्याची पाईपलाईन आणि त्यानंतर भूमिगत गटारीसाठी हा रस्ता तब्बल दोनदा खोदण्यात आला. खोदकाम केल्यानंतर रस्त्याची तात्पुरती मलमपट्टीही न करता तो तसाच उघडा टाकण्यात आला. परिणामी, पहिल्याच पावसात या मातीचे चिखलात रूपांतर झाले असून संपूर्ण रस्त्यावर पाण्याचे तळे साचले आहे. या परिसरात बसस्टँड, नामांकित महाविद्यालय आणि मुख्य बाजारपेठ असल्याने येथे २४ तास नागरिकांची आणि वाहनांची प्रचंड वर्दळ असते. महाविद्यालयात जाणाऱ्या तरुण-तरुणींना आणि लहान मुलांना या घाण चिखलातून पायपीट करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी या मुख्य रस्त्यावर फिरण्यासाठी (शतपावली करण्यासाठी) नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडतात. मात्र, रस्ता निसरडा झाल्यामुळे ज्येष्ठांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.

​या मुख्य रस्त्यावरील चिखलाच्या साम्राज्यामुळे पादचाऱ्यांच्या सुसह्य प्रवासाचे पुरते खोबरे झाले आहे. रस्ता ओलांडताना किंवा कडेने चालताना नागरिकांना प्रत्येक पाऊल चिखलात अडकत टाकावे लागत आहे. एका बाजूने वेगाने येणारी अवजड वाहने आणि दुसरीकडे निसरडी झालेली जमीन यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांचे या दलदलीमुळे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेक ज्येष्ठ नागरिकांना तोल सांभाळणे कठीण होत असून, घसरून पडल्यामुळे किरकोळ दुखापती होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पालिकेने तात्काळ या रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे. जर तांत्रिक कारणांमुळे ते आत्ता शक्य नसेल, तर किमान पावसाळा संपेपर्यंत नागरिकांना चालता येईल एवढा  मुरूम आणि खडीचा भराव टाकून रस्त्याची काळजी घ्यावी अशी मागणी परिसरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---