पावसाअभावी धुळे जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा….!

---Advertisement---

 

धुळे – यंदाच्या मान्सूनला ‘अलनिनो’ चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला असून धुळे जिल्ह्यातील ‘खरीप हंगाम’ संकटात सापडला आहे. यामुळे पेरण्या देखील रखडल्या आहेत. याचाच परिणाम स्वरूप सद्यस्थितीला संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या केवळ 15 टक्के इतक्याच पेरण्या झाल्या आहेत. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप यांनी ‘तरुण भारत’ सोबत बोलताना सांगितले की, धुळे जिल्ह्यात एकूण 3 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील सर्व पिकांची पेरणी केली जाते. यात कापसाची सर्वाधिक 2 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. मात्र यंदा मान्सूनवर झालेल्या चक्रीवादळाच्या परिणामामुळे लांबलेल्या पावसाअभावी जिल्ह्यात 24 जून अखेर पर्यंत केवळ 50 ते 60 हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यामध्ये 30 मि. मी. एवढा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग देखील सुरु असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी शाश्वत पाणीसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाची नेहमीप्रमाणे वेळेत लागवड केली असून अशा शेतकऱ्यांकडून सध्या निंदणी, कोळपणी यासारख्या शेती मशागतीच्या कामांवर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे पावसावर आधारीत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतिक्षा लागून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात खरीपच्या पेरण्या ह्या रखडलेल्या स्थितीत आहेत. 

यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असल्याने कृषी विभागाने शाश्वत पाणीसाठा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या बागायती क्षेत्रावरील पेरण्या या ड्रीपवर करण्याचे आवाहन केले आहे तसेच कोरडवाहू शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी सलग तीन दिवस पाऊस झाल्यास अथवा 75 ते 100 मि.मी. पर्यंत पाऊस पडल्यास तरच पेरणी करावी किंवा शेत जमीनीत 6 इंच ओलावा निर्माण झाल्यावर पिकांची पेरणी करावी. अन्यथा त्याशिवाय पेरणी करू नये असा सल्ला अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप यांनी दिला आहे.

धुळे जिल्ह्यात सध्या बियाणे, खते, औषधी आदींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरी देखील शेतकऱ्यांना ते मिळवताना काही अडचणी वा समस्या निर्माण होत असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्वरित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधत थेट तक्रार नोंदवावी. जेणेकरून बियाणे व खतांचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाला तात्काळ कारवाई करता येईल असे मत, अधीक्षक कृषी अधिकारी यांनी यावेळी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---