जळगावचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर प्रभावी व्यक्तींना जीवे ठार मारण्याची ई-मेलवरून धमकी प्रकरण गांभीर्यपूर्वक आहे. यात अज्ञात व्यक्तीचा तत्काळ तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेशीत व्हावे, अशी मागणी जळगाव येथील स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशीसुद्धा चर्चा करण्यात येऊन या मागणीचे देण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक प्रमोद बऱ्हाटे, सुरेश उज्जैनवाल, मुक्ती हरून नदवी, विजय पाठक व विवेक ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे ईमेलद्वारे या मागणीचे निवेदन पाठवले आहे. निवेदनात म्हटले आहे की. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हत्येच्या धमकीचा मेल थेट मुख्यमंत्री कार्यालयास मिळाल्याने जिल्ह्यासह राज्याच्या गृह विभागात खळबळ उडाली आहे. यापूर्वदिखील जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही धमकीचे मेल आले आहेत. गेल्या काही महिन्यांतील अवैध वाळू वाहतूक, अवैध धंदे, बिघडलेली कायदा सुव्यवस्थेविरोधात महसूल-पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांना धमक्यांचे आलेले मेल संदेश गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. जिल्हा सामाजिक, धार्मिक व राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस प्रशासनाला सोबत घेत त्यांच्या अधिकाराचा कौशल्यपूर्वक वापर करीत वाळू तस्करांवर विविध कारवाया केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत ७९ एमपीडीए.., सुमारे ४ हजार चॅप्टर केसेस, शेपन्नास गुंडाना हद्दपारीच्या कारवाया केल्या आहेत. विशेषतः न्यायालयातसुद्धा टिकल्याने जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारी निर्देशांक खाली आणण्यात जिल्हा व पोलिस प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने एकत्रित कारवाई सत्रामुळे जिल्हाधिकारी अडचणीचे वाटू लागले आहेत.
पोलिसांच्या कार्यक्षमतेला आव्हान ?
थेट मुख्यमंत्री कार्यालयात आलेल्या ई-मेल धमकीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गृह विभागाची थट्टा करणारा प्रकार दखलपात्र नाही, असे म्हणणे धोक्याचे ठरू शकते. जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मार्चपासून धमक्या देणारे ई-मेल असतील आणि यातील अज्ञात निष्पन्न होत नसतील तर सामान्य नागरिकांपर्यंत यातून चुकीचा संदेश जाईल, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
एसआयटी नेमण्याची मागणी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना आलेल्या धमकीच्या ईमेलच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांना आदेश मिळाल्यानंतर या गंभीर प्रकरणाला वेळीच उघड करण्यात यावे म्हणून स्वतंत्र एसआयटी पथक नेमण्यात यावे, अशी मागणी माध्यम प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.