जळगाव : शहरात शुल्लक कारणांवरुन हाणामारीचे प्रकार घडण्याचे प्रमाण वाढले आहे. छोट्या मोठ्या कारणांनी तणाव जाणवू लागला आहे. असाच प्रकार मेहरुण परिसरातील एका पेट्रोल पंपावर घडला. पेट्रोल पंपावर ‘स्पीड पेट्रोल’ नसल्याच्या कारणावरून एका ग्राहकाला पेट्रोल पंपाचा मालक समजून मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार गुरुवारी सकाळी घडला. याप्रकरणात एका आरोपीने लोखंडी कड्याने मारून ग्राहकाला जखमी केले. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, संजय नामदेव ढेकळे (वय ५४, रा. आदर्शनगर) हे गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मेहरुण जवळील पेट्रोल पंपावर आपल्या चारचाकी वाहनात डिझेल भरण्यासाठी गेले होते. त्या वेळी दोन मोटरसायकल वर आलेल्या चौघांनी त्यांना पेट्रोल पंपाचा मालक समजून ‘तुमच्याजवळ स्पीड पेट्रोल का नाही?’ अशी विचारणा करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

हा वाद विकोपाला जाऊन चौघांनी ढेकळे यांना शिवीगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. शुभम सुनील शिंदे, शरद अशोक पाटील, कुणाल पाटील आणि शेखर (पूर्ण नाव माहिती नाही) अशी चौघांनी नावे आहेत. शरद पाटील याने त्याच्या हातातील लोखंडी कडा ढेकळे यांच्या कपाळावर मारले. यामुळे ढेकळे यांना दुखापत झाली या चौघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.