जळगाव : पाच दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोने-चांदीपैकी सोने भावात एक हजार ४०० रुपयांची घसरण होऊन ते ९६ हजार ४०० रुपयांवर आले आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख सहा हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे.
पाच दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे. यामध्ये चांदीत मोठी वाढ होत असताना सोने भावात थोडी-थोडी वाढ होत गेली. २ जून रोजी ९६ हजार ६०० रुपयांवर असलेले सोने ६ जूनपर्यंत ९७ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर मात्र ७ जून रोजी त्यात एक हजार ४०० रुपयांची घसरण झाली व ते ९६ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले.
दुसरीकडे २ जून रोजी ९८ हजारांवर असलेली चांदी ६ जूनपर्यंत एक लाख पाच हजार ८०० रुपयांवर पोहोचली. त्यानंतर ७ जून रोजी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख सहा हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली व पन्हा नवा उच्चांक गाठला आहे.