---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातील सोनबर्डी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली असून, जलतरण तलावात बुडून ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 7 वर्षीय कार्तिक उर्फ उत्कर्ष गणेश पाटील हा मूळचा एकुलती येथील रहिवासी असून सध्या तो जामनेरमधील दर्शन पार्क परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. रविवारी (दि. ३ मे) सायंकाळी तो आपल्या कुटुंबासोबत सोनबर्डी येथील तरण तलावावर पोहायला गेला होता.
पोहून झाल्यानंतर कार्तिकला त्याच्या वडिलांनी तलावाजवळील चेंबरजवळ थांबवले आणि कपडे आणण्यासाठी गेले. मात्र, काही क्षणातच कार्तिकचा तोल जाऊन तो चेंबरमध्ये पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कार्तिकला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासले व त्याला मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.









