---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या पाडळसे परिसरात सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेदरम्यान चोरीच्या घटना समोर येत आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या सुरू असलेल्या या कथेसाठी दररोज लाखो भाविक उपस्थित राहत आहेत. मात्र, या मोठ्या गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कथास्थळी येणाऱ्या भाविकांच्या सोन्याच्या दागिन्यांवर आणि मोबाईल फोनवर चोरट्यांनी डोळा ठेवला आहे. कथास्थळी प्रवेश करताना किंवा महाप्रसादाच्या वेळी होणाऱ्या प्रचंड गर्दीतून चोरटे आपले काम करत असल्याचे सांगितले जात आहे. काही महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि चैन कटरच्या साह्याने कापून चोरी केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच अनेक भाविकांचे महागडे मोबाईलही लंपास झाल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे या चोरीच्या घटनांमध्ये महिलांचाही सहभाग असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे. गर्दीत मिसळून हे चोरटे भाविकांना लक्ष्य करत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कथास्थळी मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती असल्याने पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे. मैदानाचे क्षेत्र मोठे असल्याने सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे कठीण ठरत आहे. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी जिकिरीचे ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी साध्या वेशातील कर्मचारी गर्दीत तैनात केले आहेत. तसेच आयोजन समितीकडूनही व्यासपीठावरून वारंवार भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
भाविकांनी गर्दीत आपल्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









