---Advertisement---
खान्देशी लोककला, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या बहिणाबाई महोत्सवाला शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. भरारी बहुउद्देशीय संस्था आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.
या पाचदिवसीय महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, भक्तीपर कार्यक्रम आणि सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. भारत माता की आरती, किर्तन, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, वहीगायन, भावगीते तसेच मराठी संस्कृतीवर आधारित फॅशन शो यांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपल्या कला सादर करणार असून, नागरिकांसाठी खाद्यपदार्थ व गृहपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल्सही उपलब्ध आहेत.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी खेळ पैठणीचा, रांगोळी, चित्रकला आणि मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच बहिणाबाई महोत्सवाच्या ११व्या पर्वाला शुभेच्छा देण्यात आल्या.
महोत्सवात विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. उद्योग व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल मान्यवरांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. बहिणाबाई महोत्सवामुळे खान्देशी लोकसंस्कृतीला नवे व्यासपीठ मिळत असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्रमास खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी आमदार मनीष जैन, अनिकेत पाटील, अनिश शहा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्ष संगीता पाटील, दीपक सराफ, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, श्रीराम पाटील, डॉ. पी.आर.चौधरी, शैलेश मोरखडे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, जयश्री राहुल पाटील, माधुरी बारी, दीपक जोशी, सागर पगारिया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, विक्रांत चौधरी, पवन जैन, सागर परदेशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रभावीपणे पार पडले तर प्रास्ताविकातून महोत्सवामागील उद्देश स्पष्ट करण्यात आला.
---Advertisement---









