मुक्ताईनगर तालुक्यात धक्कादायक प्रकार! कोन्हाळा येथे काटेरी झुडुपात सापडले जिवंत अर्भक; परिसरात खळबळ…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोन्हाळा परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कोन्हाळा गावालगतच्या शेताच्या बांधावर असलेल्या काटेरी झुडुपात एक दिवसाचे जिवंत अर्भक आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील कोन्हाळा गावाजवळील शेताच्या बांधालगत काटेरी झुडुपात नवजात अर्भक असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अर्भकाची सुटका केली. यानंतर अर्भकाला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.

सध्या या अर्भकावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून डॉक्टरांचे पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे.
एक दिवसाचे जिवंत अर्भक झुडुपात फेकल्यामुळे त्याच्या शरीरावर जखमा व ओरखडे असल्याचे दिसून आले. अत्यंत अशक्त अवस्थेमुळे त्याला हालचाल करणेही कठीण जात असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार हे अर्भक अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमागील कारणांचा तपास पोलीस करत असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे कोन्हाळा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---