डंपर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; इंदूरमध्ये डंपरचे तुकडे करून विक्रीचा डाव हाणून पाडला…. अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; एक आरोपी अटकेत…!

---Advertisement---

 

अमळनेर तालुक्यातील गांधली येथील पेट्रोल पंपावरून सुमारे २५ लाख रुपये किमतीचा डंपर चोरून नेणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात अमळनेर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून उर्वरित साथीदारांचा शोध सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोणे येथील निलेश संजय पाटील यांचा एमएच ४८ एजी ८४०७ क्रमांकाचा डंपर ३२ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गांधली येथील पेट्रोल पंपावर उभा असताना अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. एवढ्या मोठ्या वाहनाची चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार तसेच विनोद संदानशिव, निलेश मोरे, सिद्धांत शिसोदे आणि प्रशांत पाटील यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.

सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मध्यप्रदेश, गुजरात असा पाठलाग करत तपासाचा वेग वाढवला. तब्बल नऊ दिवस मध्यप्रदेशात मुक्काम ठोकून पथकाने तपास चालू ठेवला.

दरम्यान, इंदूर येथील तेजाजी नगर परिसरात खाजू खान चांद खान याने चोरीचा डंपर गोदामात आणून त्याचे भाग वेगवेगळे केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तत्काळ छापा टाकत डंपरचे केबिन, चेसिस, बॉडी, फ्युएल टँक आणि डिझेल टँक असे भाग जप्त केले.

या कारवाईत पोलिसांनी खाजू खान याला अटक केली असून इतर साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---