---Advertisement---
ओडिशातील जगतसिंहपूर जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (डीआरडीए) कार्यालयातील महिला शौचालयात गुप्त कॅमेरा बसवून महिला सहकाऱ्यांचे चित्रीकरण केल्याप्रकरणी एका ज्युनिअर क्लार्कला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय आरोपी संजय आधेखा हा संबंधित कार्यालयात ज्युनिअर क्लार्क म्हणून कार्यरत होता. प्राथमिक तपासात त्याने इंटरनेट आणि ऑनलाइन माध्यमांच्या साहाय्याने स्पाय कॅमेऱ्यांबाबत माहिती मिळवली होती. त्यानंतर त्याने ऑनलाइन पद्धतीने गुप्त कॅमेरा खरेदी केल्याचे समोर आले आहे.
तपासादरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिला शौचालयात हा कॅमेरा बसवून अनेक महिन्यांपासून व्हिडिओ चित्रीकरण सुरू ठेवले होते. कॅमेरा नियमितपणे चार्ज करून पुन्हा त्याच ठिकाणी बसवला जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. ही बाब तेव्हा उघडकीस आली, जेव्हा शौचालयात बसविण्यात आलेला कॅमेरा अचानक खाली पडला. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला आणि कार्यालयात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून स्पाय कॅमेरा, मोबाईल फोन, पेनड्राइव्ह तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. सर्व उपकरणे फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आली असून त्यामधील डेटा तपासला जात आहे. रेकॉर्डिंग किती कालावधीचे आहे, संबंधित व्हिडीओ इतरत्र पाठविण्यात आले आहेत का आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
या घटनेमुळे सरकारी कार्यालयांमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विविध कर्मचारी संघटना आणि महिला हक्क संघटनांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, फॉरेन्सिक अहवाल आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.









