---Advertisement---
यावल शहर व तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाली आहेत. तसेच रस्त्यांवर मोठमोठे वृक्ष कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि काही भागांतील वीजपुरवठाही खंडित झाला.
यावल, चितोडा, सांगवी, डोंगरकठोरा, अंजाळे, निमगाव, टेंभी आणि राजोरा परिसरातील शेतशिवारात केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची काढणीस आलेली केळी अक्षरशः जमीनदोस्त झाली असून आर्थिक फटका बसला आहे.
राजोरा शिवारातील शेतकरी सतीष रूपचंद पाटील यांच्या शेतातील सुमारे ५ हजार केळीची झाडे वाऱ्यामुळे कोसळली. तसेच निमगाव येथील गट क्रमांक ४४ मधील उज्वला कैलाससिंग पाटील यांच्या सुमारे ३ हजार ३०० केळीच्या झाडांचे नुकसान झाले. गट क्रमांक ११३ मधील कैलाससिंग नयनसिंग पाटील यांच्या सुमारे १ हजार केळीच्या झाडांनाही फटका बसला. याशिवाय परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
वादळामुळे यावल-भुसावळ मार्गावर अंजाळे ते यावलदरम्यान अनेक ठिकाणी मोठे वृक्ष रस्त्यावर कोसळले. त्यामुळे हा मार्ग तब्बल साडेतीन तास वाहतुकीसाठी बंद राहिला. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वृक्ष हटवण्याचे काम हाती घेतले.
त्याचप्रमाणे यावल-फैजपूर मार्गावर तसेच अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील यावल-चितोडा दरम्यानही वृक्ष कोसळल्याने वाहतूक तासभर ठप्प झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पथकाने रस्त्यावर पडलेले वृक्ष हटवून वाहतूक सुरळीत केली.
अंजाळे गावात वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. जुना कोळीवाडा परिसरातील ज्ञानेश्वर नामदेव सपकाळे यांच्या घरावरील पत्रे उडाली, तर प्लॉट परिसरातील विनोद प्रकाश सपकाळे यांच्या घराचेही नुकसान झाले. त्यामुळे संबंधित कुटुंबांना उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
वादळाच्या तडाख्यामुळे अंजाळे गावातील महावितरणचे सुमारे आठ वीज खांब कोसळले. परिणामी गावातील वीजपुरवठा खंडित झाला असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.









