पावसाळा तोंडाशी, भुसावळमध्ये नालेसफाईचा बोजवारा; नाले, उपनाले आणि गटार कचऱ्याने तुंबले, नागरिकांमध्ये तीव्र संताप…!

---Advertisement---

 

मान्सूनचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना भुसावळ शहरात अद्यापही नालेसफाईची कामे पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर नाले, उपनाले आणि गटारांची साफसफाई होणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहरातील अनेक भाग संभाव्य जलसंकटाच्या छायेत आले आहेत. मॉन्सूनपूर्वी झालेल्या पावसामुळे भुसावळ शहरातील परिस्थिती बिकट झाली असून लवकरात लवकर नालेसफाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

भुसावळ शहरातील बाजारपेठेतून जाणारा मुख्य नाला सध्या कचरा, प्लास्टिक, गाळ आणि विविध प्रकारच्या घाणीने भरून गेला आहे. अनेक ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमणे झाली असून प्रवाह अरुंद झाल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी मुसळधार पाऊस झाल्यास शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुख्य नाल्याला जोडणारे लहान नाले आणि गटारेही अनेक महिन्यांपासून स्वच्छ करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पहिल्याच जोरदार पावसात रस्ते, बाजारपेठा आणि निवासी भागांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता वाढली आहे.

खडका परिसरात तर गटारीचे सांडपाणी थेट जुन्या महामार्गावर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे दुर्गंधी वाढली असून वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात केली जात आहे. “७२ तासांत कचरा उचलू”, “लवकरच विशेष सफाई मोहीम राबवू” अशा घोषणा करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी कारवाई दिसून आलेली नाही.

यामुळे डासांची संख्या वाढत असून दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सत्तास्थापनेच्या राजकारणात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी व्यस्त होते. मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतरही शहरातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. “राजकारणासाठी वेळ आहे, पण नागरिकांच्या समस्यांसाठी नाही का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---