---Advertisement---
जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः केळीसह विविध पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कृषी विभागाचे अधिकारी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासनिक अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा दाव्यांबाबत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांना आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती तात्काळ ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य नाही, त्यांनी संबंधित तालुक्यातील विमा प्रतिनिधी, कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानाची माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत पीक विमा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या काही तांत्रिक अडचणींचाही आढावा घेण्यात आला. अनेक शेतकऱ्यांच्या विमा नोंदींमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र दाखविले गेले आहे किंवा काहींचे विमा अर्ज रद्द झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पंचनामा करून वास्तविक लागवड क्षेत्र ग्राह्य धरण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेत मदत मिळावी यासाठी प्रशासन, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची नोंद करण्यास विलंब करू नये आणि आवश्यक कागदपत्रांसह तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले आहे.









