अमळनेरमध्ये खळबळ; ओटीपी न येताच नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या खात्यातून 95 हजारांचा डल्ला; तक्रार दाखल, पोलिसांचा तपास सुरू

---Advertisement---

 

अमळनेर शहरातील एका नगरपरिषद कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून कोणताही ओटीपी अथवा पुष्टीकरण कॉल न येता जवळपास 95 हजार रुपयांची रक्कम परस्पर वर्ग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे सायबर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमळनेर शहरातील ताडेपुरा येथील रहिवासी व नगरपरिषद कर्मचारी योगेश आधार पवार यांच्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातून 5 जून रोजी सकाळी सुमारे 11.38 वाजता दोन स्वतंत्र व्यवहार करण्यात आले. पहिल्या व्यवहारात 50 हजार रुपये तर दुसऱ्या व्यवहारात 44 हजार 999 रुपये 97 पैसे अशी एकूण 94 हजार 999 रुपये 97 पैशांची रक्कम इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली.

विशेष बाब म्हणजे या व्यवहारादरम्यान संबंधित खातेदाराच्या मोबाईलवर कोणताही ओटीपी प्राप्त झाला नाही. तसेच बँकेकडून व्यवहाराची पूर्वकल्पना देणारा किंवा पुष्टीकरणासाठी कोणताही कॉलही आला नसल्याचे सांगण्यात आले आहे. खात्यातून रक्कम वजा झाल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच योगेश पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कारवाई सुरू केली. त्यानंतर राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली. व्यवहाराची वेळ, रक्कम आणि इतर आवश्यक तपशील संबंधित यंत्रणांकडे सादर करण्यात आले आहेत.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित बँकेकडून व्यवहारांची माहिती मागविण्यात आली आहे. सायबर गुन्ह्याच्या विविध अंगांनी तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सायबर तज्ज्ञांच्या मते, सिम क्लोनिंग, मोबाईलमधील मालवेअर, फिशिंग, रिमोट ॲक्सेस किंवा इतर तांत्रिक माध्यमांतून अशा प्रकारचे गुन्हे घडू शकतात. कोणताही ओटीपी न वापरता व्यवहार झाल्याचा दावा असल्याने या घटनेमागील तांत्रिक बाबींचा सखोल तपास आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बँक व्यवहारांबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संशयास्पद संदेश, अनोळखी लिंक किंवा अॅप्सपासून दूर राहणे तसेच खात्यातील व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---