---Advertisement---
जळगाव शहरात काँग्रेस भवन परिसरात विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना वायरमनला विजेचा जोरदार धक्का बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने वायरमनच्या सहकाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून संबंधित वायरमन जखमी झाला आहे.
जळगाव शहरातील काँग्रेस भवन परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी मुख्य वीजपुरवठा बंद असताना जनरेटरमधून आलेल्या ‘बँक फीड’मुळे अचानक लाईनमध्ये वीज प्रवाहित झाली आणि वायरमनला जोरदार शॉक बसला.
जखमी वायरमनचे नाव राजेंद्र कोळी असे असून, शॉक बसताच ते खांबावर लोंबकळत होते. मात्र, खाली उभ्या असलेल्या सहकाऱ्यांनी तत्काळ धाव घेत त्यांना सुरक्षित खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, जखमी वायरमनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘बँक फीड’ म्हणजे मुख्य वीजपुरवठा बंद असतानाही जनरेटर किंवा इन्व्हर्टरमधून वीज परत लाईनमध्ये येणे, ज्यामुळे अशा अपघातांचा धोका निर्माण होतो. या घटनेमुळे वीज दुरुस्ती करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.









