अमळनेर गोळीबार प्रकरणी आरोपीला अटक…. मित्रानेच केला होता मित्रावर गोळीबार….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. २७ तारखेला रात्रीच्या सुमारास अमलेश्वर नगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून त्याच्याच मित्राविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव अरुण सुरेश महाजन असे असून, तो आपल्या मित्र भूषण देविदास महाजन यांच्या घरी गेला असताना ही घटना घडली. मित्राच्या घरात असतानाच त्याला गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी विविध पुरावे आणि नमुने जप्त करत तपासाची दिशा निश्चित केली आहे.
दरम्यान, मयताचा भाऊ नरेंद्र महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या रात्री अरुण हा आपल्या मित्राच्या घरी गेला होता. काही वेळानंतर “अरुणला चक्कर येऊन तो पडला” अशी माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यानंतर उपस्थितांकडून भूषण महाजन यांनीच गोळी झाडल्याचे सांगण्यात आले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी भूषण महाजन याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेत वापरण्यात आलेला गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला असून तपास अधिक गतीने सुरू आहे. गोळी मयत अरुण महाजन यांच्या छातीत अडकली असल्याने पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह जळगाव येथे पाठविण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अरुण महाजन हा स्वभावाने अत्यंत मनमिळावू आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारा तरुण म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असून त्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, नेमकी गोळीबाराची कारणे काय होती याचा शोध घेतला जात आहे. या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---