---Advertisement---
चोपडा शहरात झालेल्या एका तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात जळगाव पोलीस दलाला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. जुन्या वादातून प्रदीप राजेंद्र महाजन या ३३ वर्षीय तरुणाची हत्या करून फरार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी धावत्या ट्रेनमधून फिल्मी स्टाईलने ताब्यात घेतले.
१९ एप्रिलच्या रात्री ते २० एप्रिलच्या सकाळच्या दरम्यान, चोपडा ते धरणगाव रोडवरील पाटचारी जवळ ही घटना घडली होती. संशयित आरोपी विजय भास्कर वैदकर आणि निर्मल संजय बडगुजर (दोघे रा. चोपडा) यांनी संगनमत करून प्रदीप महाजन यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर अज्ञात हत्याराने वार करून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांमार्फत तपास केला असता, आरोपी मुंबईच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांचे एक पथक मुंबईकडे रवाना झाले. तपासादरम्यान पोलीस पथकाला माहिती मिळाली की, आरोपी दादर येथून जळगावकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये बसले आहेत.
मात्र, आरोपी नेमक्या कोणत्या ट्रेनमध्ये आहेत याची खात्रीशीर माहिती नव्हती. अशा परिस्थितीत पोलीस पथकाने नाशिक रेल्वे स्थानकावरून जळगावकडे येणाऱ्या विविध ट्रेन्समध्ये शोधमोहीम राबवली. अखेर नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये दोन्ही आरोपींना पोलिसांनी शिताफीने शोधून काढले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या.
सुरुवातीला आरोपींनी गुन्ह्याची कबुली देण्यास टाळाटाळ केली, परंतु पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी विजय वैदकर याच्याशी मृत प्रदीप महाजन यांचा जुना वाद (पूर्व वैमनस्य) होता, त्यातूनच ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.









