---Advertisement---
नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे. रायसिंग माल्या काथुड (वय ३३, मूळ रहिवासी शेरुला, ता. सोनगड, गुजरात) हा कामानिमित्त सासऱ्याच्या घरी डोगळीफळी, घोडजामने (ता. नवापूर) येथे राहत होता. याच परिसरातील १३ वर्षांची पीडित मुलगी त्यांच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी येत असे.
या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिला सासऱ्याच्या बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ नेऊन जीव मारण्याची धमकी देत तीन ते चार वेळा तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. काही दिवसांनी मुलीची प्रकृती बिघडल्याने ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर पालकांनी तिच्याशी संवाद साधला असता, आरोपीकडून वारंवार अत्याचार झाल्याची माहिती उघड झाली.
या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९२/२०२१ अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२)(फ), ३७६ (२)(एन), ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा २०१२ च्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. त्यानंतर मुदतीत दोषारोपपत्र नंदुरबार येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या न्यायालयात झाली. या दरम्यान पीडित मुलगी, तिचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच, तपास अधिकारी आणि डीएनए तपासणी करणाऱ्या तज्ज्ञांच्या साक्षींना विशेष महत्त्व देण्यात आले. या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२)(फ), ३७६ (२)(एन), ३६३ (अ), ५०६ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि एकूण २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.









