बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास; १६ हजार दंड

---Advertisement---

 

नंदुरबार : व्हेपर्स घेऊन देण्याचा बहाणा करत सातवर्षीय बालिकेला सोबत घेत धरणाकडे नेले. या ठिकाणी नराधामाने तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी खटल्याच्या चौकशीअंती न्यायालयाने किसन ऊर्फ किश्या नामदेव गावित (वय ३८, रा. बंधारपाडा- वडगाव) याला २० वर्षे सश्रम कारावास तसेच १६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

घटनेची माहिती अशी: तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सोनगीरपाडा या गावात तक्रारदारांच्या आईसह भावांच्या घराचे बांधकाम करायचे होते. यासाठी २१ मार्च २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तक्रारदार त्यांच्या पतीसह जुन्या घराच्या भिंतीच्या विटा काढत होते. त्या वेळी तक्रारदारांच्या सातवर्षीय बालिकेस त्यांच्या ओळखीचा मिस्तरी काम करणारा किसन ऊर्फ किश्या गावित याने बालिकेस व्हेपर्स घेण्याच्या बहाण्याने बालिकेला दुकानावर जाऊया, असे आमिष देत पीडितेच्या कुटुंबियांची संमती न घेता सोबत सोनगीरपाडा धरणाकडे नेले. या ठिकाणी त्याने या बालिकेवर अत्याचार केले.

याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता ६५ (२), १३७ (२) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ५ (एम) व ६ प्रमाणे पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी सुनील भाबड यांनी गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले व संशयित आरोपीविरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र नंदुरबार येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात सादर केले.

खटल्याची चौकशीचे कामकाज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात झाली. सरकारपक्षातर्फे महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित बालिका, पीडित बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायायलयाने आरोपीला भारतीय न्यायसंहिता कलम ६५ (२), १३७ (२) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम-२०१२ चे कलम ४, ६ प्रमाणे दोषी ठरवत वीस वर्षे सश्रम कारावास व १६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

खटल्यात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. बी. यू. पाटील यांनी कामकाज पाहिले. मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, कोर्ट पैरवी अंमलदार हवालदार नितीन साबळे, हवालदार शैलेंद्र जाधव व हवालदार राजेंद्र गावित यांनी कामकाज पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---