जळगाव जिल्ह्याबाहेर खतांची विक्री केल्यास परवाना रद्द होणार; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आदेश…!

---Advertisement---

 

जळगाव : खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित खतांच्या साठ्याची मागणी नोंदविली जाते. मात्र, खतांचा साठा उपलब्ध झाल्यानंतर अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री होत असल्याने स्थानिक पातळीवर खतांचा तुटवडा निर्माण होतो, ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील साठा शेजारच्या जिल्ह्यात विक्रीला मनाई केली आहे. परवानाधारकांनी शेजारच्या जिल्ह्यातील विक्रेत्यांना खतांचा साठा विक्री केल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित परवानाधारकांवर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

विदर्भातील बुलडाणा, मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्याची सीमा जळगाव जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे गतकाळात सीमाभागातल्या काही विक्रेत्यांनी शेजारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाण्यांसह खतांची विक्री केल्याचे उघड झाले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. याची दखल घेऊन हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कृषी विभागाने खतांसह बियाण्यांचा सुरळीत पुरवठा व्हावा आणि काळाबाजार रोखण्यासाठी आता जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. शेतकऱ्यांसह परवानाधारकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा कक्ष सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सेवेत असेल. जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अविनाश खैरनार व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्याशी संपर्क साधून बियाणे, खत, किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठा संदर्भात तक्रार नोंदविता येणार आहे. [email protected][email protected] वर देखील तक्रार दाखल करता येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी अपेक्षित असलेल्या साठ्याची मागणी आपण नोंदविली आहे. या साठ्याचे वितरण करताना आधारकार्डची सक्त्ती केली असून बाह्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ दिल्यास स्थानिक पातळीवर तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला आलेला साठा स्थानिक शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---