---Advertisement---
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र कनाशी येथे भेट देत श्री चक्रधर स्वामींचे दर्शन घेतले. त्यांच्या या भेटीमुळे परिसरात भक्त आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
महानुभाव पंथासाठी अत्यंत पवित्र मानले जाणारे श्रीक्षेत्र कनाशी हे “महानुभाव पंथाची काशी” म्हणून संपूर्ण राज्यात ओळखले जाते. या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला दरवर्षी हजारो भाविक भेट देत असतात.
आमदार रोहित पवार यांनी श्री चक्रधर स्वामी मंदिरात जाऊन विधिवत पूजाअर्चा केली. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करत स्वामींच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या भेटीदरम्यान मंदिर परिसरात भक्तांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
श्रीक्षेत्र कनाशी हे महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान मानले जाते. त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. रोहित पवार यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा या पवित्र स्थळाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.









