---Advertisement---
नागपूर : जनगणना प्रक्रियेसाठी महिला शिक्षिकांची एकेकटी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील संवेदनशील, अनोळखी आणि दूरवरच्या भागांत घरोघरी जाऊन माहिती संकलित करावे लागत असल्याने महिला शिक्षिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे सुरक्षिततेबाबत मागणी करण्यात आली असता, “तुमच्या नवऱ्याला, नातेवाईकांना किंवा घरच्यांना सोबत घेऊन जनगणना करा,” असा उफराटा सल्ला अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचा आरोप शिक्षिकांनी केला आहे. त्यामुळे शिक्षिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सध्या जनगणनेसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून, अनेक महिला शिक्षिकांनी प्रशासनाकडे सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. विशेषतः महिलांना दोन-दोनच्या गटात नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, प्रशासनाने या मागणीवर कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने नाराजी वाढली आहे.
महिनाभर चालणाऱ्या जनगणना मोहिमेदरम्यान दररोज कुटुंबातील व्यक्तींना सोबत आणणे शक्य नसल्याचे शिक्षिकांचे म्हणणे आहे.
“एक-दोन दिवस कुणी सोबत येईल, पण संपूर्ण मोहिमेत हे कसे शक्य होणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
शहरातील काही भाग संवेदनशील असल्याने महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारून महिलांना गटाने नियुक्ती द्यावी, तसेच आवश्यक सुरक्षाव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महिला शिक्षिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.









