---Advertisement---
अमळनेर शहरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी अवैधरित्या गोवंश वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करत दोन बैलांसह मालवाहू वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी चालकासह संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अमळनेर पोलीस ठाणे येथे कार्यरत पोलीस कर्मचारी गोपनीय गस्त घालत असताना गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून माहिती प्राप्त झाली. गलवाडे- अमळनेर मार्गावरील दाजीबा नगरसमोर एका संशयित मालवाहू वाहनातून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. MH-१९ CY- ५९१७ क्रमांकाचे मारुती सुझुकी सुपर कॅरी हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे आढळले. तपासणीदरम्यान दोन बैल दाटीवाटीने भरून त्यांना चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता वाहतूक केल्याचे समोर आले. चालक उज्वल रविंद्र पाटील (वय २५, रा. धार, ता. अमळनेर) याच्याकडे वाहतुकीसाठी आवश्यक परवाना तसेच पशुवैद्यकीय तपासणीचा दाखला नसल्याचे आढळले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित बैल रऊफ कुरेशी (रा. बेटावद, ता. जि. धुळे) यांच्याकडून घेऊन नेरी (ता. जामनेर) येथे नेत असल्याची माहिती मिळाली. जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये सुमारे ७ वर्षांचा गावरान जातीचा पांढऱ्या रंगाचा बैल (अंदाजे किंमत १८ हजार रुपये) आणि सुमारे ६ वर्षांचा जर्सी जातीचा तपकिरी बैल (अंदाजे किंमत १५ हजार रुपये) यांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे २ लाख रुपये किंमतीचे मालवाहू वाहन जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे २ लाख ३३ हजार रुपये आहे.
प्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यानुसार कलम ११ (ड)(ई)(फ)(क), भारतीय न्यायदंड संहिता कलम ३(५) तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला असून पुढील तपास सुरू आहे.









