---Advertisement---
विदर्भाच्या राजकारणात सक्रिय असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील त्यांचे समर्थक आणि भुसावळ शहराचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे देखील लवकरच ‘धनुष्यबाण’ हाती घेणार असल्याचे चर्चा शहरात सुरु आहे. या राजकीय घडामोडीमुळे भुसावळच्या आगामी राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भुसावळ नगरपालिकेत सध्या शिंदेच्या शिवसेनेची ताकद मर्यादित असली, तरी अनिल चौधरी यांच्या प्रवेशानंतर चित्र बदलू शकते. सध्या माजी नगरसेवक दीपक धांडे हे पक्षाची धुरा एकहाती सांभाळत असून, त्यांच्या पत्नी शारदा धांडे या नगरसेविका आहेत. मात्र, अनिल चौधरींसारख्या अनुभवी नेत्याच्या आगमनामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ‘धनुष्यबाण’ हाती घेतल्यानंतर अनिल चौधरी नेमके कोणाविरुद्ध ‘बाण’ सोडणार. हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. अनिल चौधरी यांनी धनुष्यबाण हाती घेतल्यास भुसावळची राजकिय परिस्थीती बदलू शकते. पूर्वीप्रमाणेच गल्लोगल्ली शाखा उघडतील असे बोलले जाते.
तीन दशकांनंतर पुन्हा ‘शिवसेने ‘कडे वाटचाल अनिल चौधरी यांची राजकीय कारकीर्द रंजक राहिली आहे. १९९९ पूर्वी ते शिवसेनेतच कार्यरत होते, परंतु काही मतभेदांमुळे त्यांनी आणि त्यांचे बंधू माजी आमदार संतोष चौधरी यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भुसावळ आणि रावेर परिसरात पक्षाची मुळे घट्ट केली. मधल्या काळात काही वर्षे राजकारणापासून दूर राहिल्यानंतर, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी पुन्हा सक्रीय सहभाग घेतला होता. आत्ता तब्बल ३० वर्षांनंतर ते पुन्हा एकदा आपल्या मूळ विचारधारेकडे, म्हणजेच शिवसेनेकडे वळत असल्याने या निर्णयाकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अनिल चौधरी आणि माजी आमदार संतोष चौधरी हे बंधू जर एकत्रपणे शिवसेना (शिदे गट) मध्ये सामील झाले, तर भुसावळच्या राजकारणात एक मोठे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळेल. कारण लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री भंगाळे-गौर या संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत. त्यामुळे, संतोष चौधरी यांनी भूमिका बदलल्यास, भंगाळे यांचे अवैध जातीय प्रकरणाला वेगळे वळण येवून त्यांची राजकीय कारकिर्द उज्वल करण्यासाठी लाभदायी ठरू शकते त्यांनाही त्याच प्रवाहात सामील व्हावे लागण्याची दाट शक्यता आहे. हे समीकरण प्रत्यक्षात आल्यास, भाजपसाठी भुसावळमध्ये मोठी डोकेदुखी ठरू शकते. कारण जिल्ह्यांचे पालकमंत्री शिवसेनेचे असल्याने शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी बळ मिळेल, असे बोलले जात आहे.









