---Advertisement---
मुंबई, दि. — हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये पनीरची डिश ऑर्डर करताना आता ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’ (वनस्पतीजन्य घटकांपासून बनवलेला कृत्रिम पदार्थ) वापरून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कडक भूमिका घेतली आहे.
शुद्ध पनीर हे केवळ दुधापासून तयार केले जाते. मात्र, खर्च कमी करण्यासाठी काही हॉटेल्समध्ये ‘चीज ॲनालॉग’चा वापर केला जातो. हा पदार्थ वनस्पती तेल व इतर घटकांपासून बनवलेला असून दिसायला अगदी पनीरसारखाच असल्याने ग्राहकांना फरक ओळखणे कठीण जाते.
Food Safety and Standards Act, 2006 अंतर्गत आता रेस्टॉरंट, केटर्स आणि फास्ट फूड व्यावसायिकांसाठी खालील नियम बंधनकारक करण्यात आले आहेत:
मेनूकार्डवर स्पष्ट उल्लेख: डिशमध्ये ‘चीज ॲनालॉग’ वापरल्यास त्याची माहिती मेनूमध्ये देणे आवश्यक
बिल आणि डिस्प्लेवर माहिती: डिजिटल बोर्ड आणि ग्राहकांच्या बिलावरही याचा उल्लेख करणे बंधनकारक
कठोर कारवाई: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार
अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. पनीर खरेदी करताना नेहमी उत्पादनाचे लेबल तपासावे आणि हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बिल घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे आढळल्यास तात्काळ टोल-फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे पुढच्या वेळी पनीरची डिश ऑर्डर करताना ‘खरे पनीर’ आहे का, याची खात्री करणे आता तुमच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.









