चोपडा : दिवसेंनदिवस घरगुती अपघातात वाढ होत असल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारास घरातील दैनंदिन कामे करताना विवाहितेला विजेचा धक्का लागला. हा विजेचा धक्का एवढा मोठा होता की या त विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याची दुर्घटना मंगळवार १३ मे रोजी मामलदे येथे घडली. यासंदर्भात चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिता अनिल पाटील (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिता पाटील ह्या आपल्या कुटुंबासोबत मामलदे गावात राहत होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे घरी दैनंदिन कामे करत होत्या. घरकाम करीत असताना अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्या गंभीररित्या जखमी झाल्या व जागीच बेशुद्ध पडल्या. या अपघाताची बातमी मिळताच परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने अनिता पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. या सर्वानी विवाहितेला तातडीने उपचारासाठी चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. अनिता पाटील यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पती आणि इतर कुटुंबीय आहेत. या घटनेची नोंद चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.