अमळनेर : दुचाकीला कारने कट मारल्याने उद्भवलेल्या वादातून झालेल्या हाणामारीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना आज, रविवार , ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. ही घटना अमळनेर तालुक्यातील जळोद-अमळगाव शिवारात घडली. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे.
पिंगळवाडे येथे विकास प्रवीण पाटील (वय ३० रा. अमलेश्वर नगर, अमळनेर) हा मित्रांसह तमाशा पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या मोटरसायकलला स्विफ्ट कार (एमएच १९ बीजे ४७९१) ने कट मारला. यात दुचाकीचे इंडिकेटर तुटले. त्यावरून दोन्ही गटात वाद होऊन अमळगाव जळोद रस्त्यावर हाणामारी झाली. त्यानंतर काही जणांनी लोखंडी रॉड, दांडके घेऊन आले. त्यात विकास पाटील हा पळत सुटला. मात्र, त्याला गाठून संशयित आरोपींनी मारहाण करून त्याचा खून करत पोबारा केला. ही घटना ३ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त कळताच मारवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीभाऊ पाटील, संजय पाटील यांनी भेट दिली.
विकास पाटील याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला होता. तेथे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहे. मात्र, त्यांची धरपकड सुरु असून एलसीबीच्या टीमने जामनेर तालुक्यात तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून एक जण शेंदुर्णी परिसरात शिक्षक असल्याचे सूत्रांनी सांगितलं. संशयित आरोपी नितीन दिनकर पवार, अमोल वासुदेव कोळी, मनोज हनुमंत श्रीगणेश, हर्षल नाना गुरव, रोहित सीताराम पाटील, कमलाकर हनुमंत श्रीगणेश यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून अमोल कोळी, नितीन पवार, हर्षल गुरव यांना जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. आणखी संशयित आरोपी वाढण्याची शक्यता आहे.