चाळीसगावात लाच लुचपत विभागाची कारवाई; ४ हजारांची लाच घेताना एकाला रंगेहात पकडलं….!

---Advertisement---

 

चाळीसगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई करत एका खासगी इसमाला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल व नोंदणी कार्यालयातील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सुनिल शिवदास निकम (वय ४७, रा. आनंदवाडी, जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर आरोपीचे नाव आहे. तक्रारदार हे पिलखोड (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असून त्यांच्या मालकीच्या बिनशेती प्लॉटच्या खरेदीखत आणि ‘सुची क-०२’ या कागदपत्रांच्या प्रमाणित नक्कल मिळविण्यासाठी ते ३० एप्रिल रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात गेले होते.
त्यावेळी आरोपी सुनिल निकम उर्फ नाना याने संबंधित कागदपत्रांच्या नक्कल देण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापैकी ५ हजार रुपये त्याने आधीच स्वीकारले होते, तर उर्वरित ४ हजार रुपये कागदपत्र देताना देण्याची मागणी करण्यात आली होती.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ACB पथकाने प्राथमिक पडताळणी करून सापळा रचला. नियोजनानुसार कारवाई करत आरोपीने कागदपत्रांच्या नक्कल देताना ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सार्वजनिक सेवांशी संबंधित कामासाठी पैसे मागणे हे गंभीर अपराध मानले जातात आणि त्यासाठी कठोर कारवाईची तरतूद आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकाने ही सापळा कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. पथकातील अधिकाऱ्यांनी अचूक नियोजन आणि तत्परतेने ही कारवाई करत आरोपीला अटक केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---