---Advertisement---
जळगाव: ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेला भारत बंद जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पार पडला. विविध सामाजिक संघटनांच्या सहभागामुळे आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळाला.
आंदोलकांनी मांडलेल्या प्रमुख तीन मागण्यांमध्ये ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे, उच्च शिक्षणात एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांवरील भेदभाव रोखण्यासाठी कडक UGC इक्विटी नियम लागू करणे आणि २०११ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मधून सूट देणे या मागण्यांचा समावेश होता.
जळगाव जिल्ह्यात सुमारे २० ठिकाणी आंदोलन करण्यात आले. शहरात टॉवर चौक, चित्रा चौक, दाणा बाजार, घाणेकर चौक, नेहरू चौक आणि कोर्ट चौक या प्रमुख भागांमध्ये आंदोलकांनी चक्का जाम केल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या आंदोलनाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे शहराध्यक्ष वसंत कोलते यांनी केले. आंदोलनात राष्ट्रीय सेन संघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, आदिवासी टोकरा कोळी महासंघ, बहुजन क्रांती मोर्चा यांसह विविध संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्ह्यासह राज्य आणि देशभरातील अनेक भागांत हा बंद पाळण्यात आल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.









