भुसावळ तालुका हादरला ; अज्ञाताकडून दोन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून हत्या.. नागरिकांमध्ये प्रचंड संताप….!

---Advertisement---

 

भुसावळ तालुक्यातील साकरी गावात आज सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गावातीलच दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निर्दयपणे हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुली आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. मात्र काही वेळानंतर गावाजवळील विहिरीत त्यांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती मिळताच साकरी गावात मोठी गर्दी जमली. संतप्त ग्रामस्थांनी रोहन नरेंद्र चौधरी या संशयितावर गंभीर आरोप करत तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असताना काही ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून हत्या नेमकी कशामुळे आणि कोणत्या कारणासाठी करण्यात आली याचा शोध सुरू आहे.

मृतदेह ताब्यात देण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मृतदेह तात्काळ ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे साकरीसह संपूर्ण भुसावळ तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पालक वर्गामध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---