---Advertisement---
धरणगाव शहरात सध्या गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यातूनच काळाबाजार वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून शहर आणि परिसरातील नागरिकांना स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.
धरणगाव शहरात नियमितपणे गॅस घेणाऱ्या ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून नोंदणी केलेली असतानाही त्यांना सिलेंडरसाठी १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. गॅस एजन्सीकडून सतत विलंब होत असल्याचे सांगितले जात असून, यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात इतरत्र गॅसचा तुटवडा नसताना धरणगावातच कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप होत आहे.
या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खुलेआम ब्लॅकमध्ये गॅस सिलेंडर १५०० ते १८०० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असून, प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसत आहेत. अनेक तास वाट पाहूनही सिलेंडर मिळत नसल्याने संताप वाढत आहे. या परिस्थितीत संबंधित वितरण यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत. काही नागरिकांनी तर या प्रकारात हातमिळवणी असल्याचा आरोप केला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे शहरातील सामान्य जनतेत प्रचंड नाराजी पसरली आहे. गॅससारख्या अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार होत असताना प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याची टीका होत आहे. नागरिकांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पुरवठा विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि काळाबाजार थांबवावा, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.









