घरात काळी जादू, त्यामुळे कौटुंबिक कलह व आजारपण वाढले; जळगावात अंधश्रद्धेचा काळाबाजार उघड, तरुणाला ७५ लाखांचा गंडा…!

---Advertisement---

 

घरात काळी जादू करण्यात आली असून, त्यामुळे कौटुंबिक कलह व आजारपण वाढले आहे. ते दूर करून देतो, असे सांगत विनोद जयराम भोपे (रा. सुधाकर नगर, जळगाव) या तरुणाची तब्बल ७५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मे २०२४ ते ऑक्टोबर २०२४ यादरम्यान घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात २१ एप्रिल २०२५ रोजी तक्रार अर्ज देण्यात आला होता. यासोबतच एका नातेवाइकाने मांत्रिकाला पाठवून पूजा करून फसवणूक केल्याचीही २२ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दिली आहे. या दोन्ही प्रकरणांत न्याय मिळावा, यासाठी पीडित तरुणाने पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.

जळगाव शहरातील सुधाकर नगरमधील रहिवासी विनोद भोपे यांचा २०१९ मध्ये अमरावती जिल्ह्यातील एका तरुणीशी विवाह झाला. त्यानंतर घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद होऊ लागले. काही दिवसांनी तरुणाच्या सासरच्यांनी एका मांत्रिकाला पाठविले व पूजा करण्यास सांगितले. ही पूजा केल्यानंतर वाद सुरूच होते. त्यामुळे १४ जानेवारी २०२४ रोजी पत्नी माहेरी निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अस्वस्थ झालेला तरुण पत्नीला परत आणण्यासाठी प्रयत्न करीत होता. १ मे २०२४ रोजी भोपे हे शिरसोली येथे गेले असताना, तेथे एका मांत्रिकाची ओळख झाली. त्याने घरात केलेल्या पूजेची माहिती दिल्याने तरुणाचा त्यावर विश्वास बसला. त्यामुळे मांत्रिकाला घरी नेले असता, मांत्रिकाने घरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून काळ्या बाहुल्या निघाल्याचे तरुणाला दाखविले. त्यानंतर हा मांत्रिक वेळोवेळी तरुणाकडून पैसे उकळू लागला. एक, दोन दिवसांआड १० हजार, कधी ५० हजार अशी ऑनलाइन पद्धतीने रक्कम घेतली व रोख स्वरूपात ६५ ते ७० लाख, असे एकूण ७५ लाख रुपये मांत्रिकाने घेतल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.

विनोद भोपे या तरुणाची चटई बनविण्यासाठी लागणारे दाणे तयार करण्याची कंपनी होती. मांत्रिकाने वेळोवेळी पैशांची मागणी केल्याने कंपनीतील मशिनरी व इतर साहित्य विकून त्याला पैसे दिले. या प्रकरणात संबधितांवर कारवाई व्हावी, यासाठी तरुणाने पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आहे.

एवढी मोठी फसवणूक झाल्याची तक्रार आपल्यापर्यंत आलेली नाही. तशी काही तक्रार असल्यास चौकशीतून खरे काय असेल ते समोर येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी दिली.



Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---