---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील दहिवद येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव अविनाश रमेश पाटील (वय ४०) असे असून, ते काही दिवसांपूर्वी घराबाहेर गेले होते. मात्र ते परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला होता.
हेही वाचा, धावत्या कारला अचानक आग, पाच जणांचा दुर्दैवी अंत
दहिवद गावातील काही नागरिकांना विहिरीत संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने मदत करत मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसर दुर्गम असल्यामुळे जागेवरच पंचनामा करण्यात आला.
प्राथमिक तपासात मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवालानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे दहिवद गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









