---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक १२ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास परिसरातील शेत शिवारात बिबट्याने गायीचा फडशा पाडला आहे. यामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांपासून ते परिसरातील ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून गिरणा नदी परिसरातील शेतांमध्ये वारंवार बिबट्या दिसत असल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांपासून ते परिसरातील ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण आहे.
या संदर्भात स्थानिक शेतकरी तथा जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार यांनी वन विभागाकडे लेखी तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नदीकाठच्या शेतांमध्ये हरिण, निलगाय, रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर आधीपासून असतो. मात्र मागील काही महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
काही दिवसांपूर्वी शेत परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आणि हालचाली आढळल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे जनावरांवर हल्ला होण्याची तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची चिंता व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर वन विभागाने तात्काळ पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहिम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच परिसरात सोलर लाईट आणि कॅमेरे लावण्याचीही मागणी स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान, या भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे काम सुरू असताना शेतमजूर आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने कारवाई करून परिसरातील नागरिकांची भीती दूर करावी, अशी मागणी होत आहे.









