क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित आणि रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली तसेच अलरीक इलेक्ट्रिकल्सच्या सहप्रायोजकत्वाने ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ (JCL T-20) स्पर्धेचा रंगतदार प्रारंभ होणार असून, त्यापूर्वी शहरात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.


ही T-20 लीग १८ ते २६ एप्रिल दरम्यान कांताई नगर, जैन ड्रीम स्पेसेस, मेहरूण तलावाजवळील मैदानावर रंगणार असून, सहा संघांमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर काव्यरत्नावली चौकातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार यांच्यासह मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली.


या रॅलीत संघ मालक, प्रशिक्षक आणि खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. काव्यरत्नावली चौकातून सुरू झालेली ही रॅली कलेक्टर बंगला मार्ग, मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र्य चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा प्रारंभ स्थळी परतली.


रॅलीनंतर संघ मालक व मान्यवरांच्या हस्ते सहा संघांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यामध्ये जळगाव कोगटा किंग, पाचोरा एसकेटी योद्धाज, जामनेर सातपुडा हिरोज, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स, अमळनेर सुहांस जायंट्स आणि रावेर रॉयल्स या संघांचा समावेश आहे.


‘आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा!’
“आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा… खेळाची ताकद दाखविण्याचा, जळगावची शान उंचाविण्याचा,” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. संघांचे ध्वज, आकर्षक जर्सी आणि खेळाडूंचा उत्साह यामुळे रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेमुळे शहरात क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, येत्या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रॅलीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मोठे सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---