Crime News : लक्ष्मीपूजनासाठी ठेवलेले दागिने चोरट्याने केले लंपास

जळगाव :  दिवाळी सणात वेगवेगळ्या दिवसांना महत्त्व आहे. दिवाळी सणाला वसुबारासपासून प्रारंभ होऊन भाऊबीजने सांगता होत असते. याच प्रमाणे लक्ष्मी पूजनाचा दिवस देखील मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. घराघरांमध्ये लक्ष्मीचे पूजनात घरातील दागदागिने, पैसे यांची पूजा करण्याची प्रथा आहे. आशाच प्रकारे लक्ष्मीपूजनासाठी घरात मांडून ठेवण्यात आलेल्या तब्बल १४ तोळे सोने चोरट्याने घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शहरातील गणेश कॉलनी परिसरात ॲड. प्रताप निकम यांचा रहिवास आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या घरात चाेरट्याने त्यांच्या डोळ्यासमोरच भरदिवसा डल्ला मारत घरातून तब्बल १४ तोळे सोने चोरल्याची घटना घडली आहे.

ॲड. प्रताप निकम यांनी १ नोव्हेंबर रोजी घरात लक्ष्मीपुजनासाठी १४ तोळे वजनाचे साेन्याचे दागिने व काही चांदीच्या वस्तु देवासमोर ठेवल्या होत्या. ही पूजा रात्रभर तशीच होती. दुसऱ्या दिवशी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता ॲड. निकम हे घरासमोर मंदिरात दर्शनासाठी गेले. यावेळी त्यांच्या पत्नी घरात तर मुलगा वरच्या मजल्यावर होता.

चोरट्याने ही संधी साधत त्यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्याने देवा समोर मांडून ठेवलेले सर्व दागिने उचलून घेत पळ काढला. दरम्यान, चोरटा घराबाहेर पडण्यापूर्वी ॲड. निकम हे घरात आले. त्यांनी चोरटा दागिने घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनी चोरट्याला दोन वेळा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला व चोरट्याने त्यांना धक्का देऊन पळ काढला.

दरम्यान, घटनेनंतर ॲड. निकम यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.