---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील लोहारखेडा फाट्यावर शेतकरी आणि ग्रामस्थांनी इंदूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. लोहारखेडा फाट्यावर भुयारी मार्ग उभारण्यात यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
गेल्या दोन तासांपासून शेतकरी व ग्रामस्थांनी महामार्ग अडवून धरल्यामुळे इंदूर-हैदराबाद महामार्गावर तब्बल पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीचा फटका प्रवासी, वाहनचालक आणि मालवाहू ट्रक चालकांना बसत आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जोपर्यंत सक्षम अधिकारी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी येऊन भुयारी मार्गाबाबत ठोस आणि लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ठाम पवित्रा शेतकरी आणि ग्रामस्थांनी घेतला आहे.
या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









